७४ ग्रामपंचायतींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सोडत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार, १६ एप्रिल रोजी होणार आहे. ही सोडत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, भूम येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या सोडतीकडे तालुक्यातील गावपुढाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ विकासाची दिशा ठरवणारी नसून, गावपुढाऱ्यांची गावातील प्रतिष्ठाही ठरवते. त्यामुळे सरपंचपदासाठी कोणत्या ग्रामपंचायतीला कोणते आरक्षण लागू होणार, याकडे सर्वच इच्छुक व स्थानिक नेत्यांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे. या वेळी तालुक्यातील सर्व ७४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडतीसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच इच्छुक उमेदवार व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार जयंतराव पाटील यांनी केले आहे.
