चिंतामणी हसबनीस, शीतल बापट, अरुण मेहेत्रे मानकरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव पोतदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्वरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू, शाहिरी परंपरेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाहीर हेमंतराजे मावळे, शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल श्यामची आई फाउंडेशनच्या संचालिका शीतल बापट, अंधांना आपल्या चित्रांतून कलेचा आनंद देणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस आणि सकारात्मक पत्रकारितेसाठी ज्येष्ठ पत्रकार अरुण मेहत्रे या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता नीतू मांडके सभागृह, टिळक रस्ता येथे होणार आहे. सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘शब्दसारथी’चे संचालक पराग पोतदार यांनी दिली.
आचार्य डॉ. माधव पोतदार हे विचारवंत आणि साहित्यिक होते. त्यांनी आपल्या हयातीत तब्बल १८३ पुस्तकांचे लेखन केले होते. ते उत्तम चित्रकार होते. त्यांनी आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. तसेच मराठी या विषयाचे अध्यापन करण्याबरोबरच एसएनडीटीच्या माध्यमातून २ हजार महिलांना पदवीधर करण्याचे काम केले होते.
त्यांचे विविध क्षेत्रांतील हे बहुमोल कार्य लक्षात घेऊन यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता त्या क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. त्यातून समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल, असे पराग पोतदार यांनी सांगितले.
