१ लाख ८० हजारांचा ऐवज परत न केल्याने पोलिसांकडे तक्रार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चिकनगुणियाचा त्रास असल्याने घरातील कामे करणे कठीण झाले होते. त्यामुळे फिर्यादी महिलेने आपल्या गावातील बहिणीच्या १९ वर्षांच्या मुलीला घरकामासाठी मदतीसाठी बोलावले. मात्र, तिच्यावर विश्वास ठेवून बोलावलेल्या त्या मुलीनेच ८० हजार रुपये रोख व एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी भवानी पेठेतील गुळ आळीत राहणाऱ्या ३८ वर्षांच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला डिसेंबरच्या अखेरीस चिकनगुणिया झाल्यामुळे दैनंदिन घरकाम करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी मदतीसाठी धारवाड येथून आपल्या बहिणीच्या १९ वर्षांच्या मुलीला बोलावले. ती मुलगी घरकामात मदत करत होती. फिर्यादी यांनी पतीच्या पगारातून बचत केलेले ८० हजार रुपये कपाटात ठेवले होते.
२६ डिसेंबर रोजी घर आवरत असताना फिर्यादीने तिला दागिने व रोख रक्कम दाखवली. त्यावेळी तिने सोन्याच्या चैनचा फोटो काढून तो आपल्या मित्राला पाठवला. त्याबाबत विचारणा केली असता, “ही चैन मला आवडली, याच डिझाईनची चैन बनवणार आहे,” असे तिने सांगितले.
काही दिवसांनी ती गावी जाण्याच्या घाईत होती. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने ३ जानेवारी रोजी तिला बसमध्ये बसवून गावी पाठवले. त्यानंतर ७ जानेवारी रोजी कपाट तपासले असता सोन्याची चैन व रोख रक्कम गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
फोनवर विचारणा केली असता तिने फोन कट केला. नातेवाईकांमार्फत तिला पैसे व चैन परत देण्यास सांगण्यात आले, मात्र तीन महिन्यांनंतरही काहीही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दत्तात्रय चरापले करत आहेत.
