वकील व बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एका मिळकतीची आधीच विक्री झालेली असतानाही ती माहिती लपवून तीच मालमत्ता दुसऱ्यांदा विकून तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वकिलासह एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अतिश भाऊसाहेब भुजबळ (वय ३७, रा. चंदन गार्डन, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अॅड. विक्रम ईमानुअल अमोलिक (वय ४२), जॉर्ज राजन उनिथान (वय ४५) आणि एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा प्रकार १९ डिसेंबर २०२३ ते ५ मे २०२४ या कालावधीत कोंढवा परिसरातील चंदन गार्डन येथे घडला. फिर्यादी भुजबळ हे राहण्यासाठी घर शोधत असताना, त्यांना चंदन गार्डन परिसरात एक तीन मजली घर विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी घरमालक विक्रम अमोलिक याच्याशी संपर्क साधला. ६४ लाख रुपये किंमतीला व्यवहार ठरवून, त्यात असणाऱ्या भाडेकरूला ९ लाख रुपये डिपॉझिट परत करून त्यांनी घराचा ताबा घेतला.
मात्र, ५ मे २०२४ रोजी चार जणांनी या मिळकतीची पाहणी करण्यासाठी येऊन चौकशी केली असता, वास्तविक ही मालमत्ता विक्रम अमोलिकने २०१८ मध्येच जॉर्ज उनिथान याला विकल्याचे उघड झाले.
या दोघांनी एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून, सदर मिळकतीचे बाजारमूल्याच्या तुलनेत अधिक म्हणजे १ कोटी रुपये दाखवले. त्यावरून जॉर्ज उनिथान याला कंपनीने ९८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.
मात्र, कर्ज न भरल्याने फायनान्स कंपनीने देखील या मिळकतीवर दावा दाखल केला. फिर्यादी भुजबळ यांनी अमोलिक याला जाब विचारल्यावर, ‘‘मी वकील आहे. माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही.
तुला काय करायचे ते कर,’’ असे म्हणून त्यांना धमकावण्यात आले. या प्रकाराची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली असतानाही पोलीस तक्रार नोंदवत नव्हते. शेवटी भुजबळ यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करत आहेत.
