वाडेगाव येथे अवैध गावठी दारू निर्मितीवर कारवाई : १.८५ लाखांचा मुद्देमाल नष्ट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारू तयार करण्यासाठी अवैध हातभट्ट्या लावल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आणि एक इसमावर गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन तेरे, पोलीस हवालदार सागर जगताप, सुधीर शिवले आणि शुभम चिनके यांना वाडेबोल्हाई, कोलवडी, अष्टापूर परिसरात पेट्रोलिंग करत अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे वाडेगाव हद्दीतील चव्हाण वस्तीजवळ मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टी लावण्यासाठी वापरण्यात येणारा एकूण १,८५,००० किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आणि घटनास्थळीच नष्ट केला.
यावेळी घटनास्थळी उपस्थित पत्थर सिंग राजपूत (रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी सांगितले की, “अवैध गावठी दारू व्यवसायावर कारवाई ही सातत्याने सुरू राहील आणि अशा अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत.”
