सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांकडून ८ तरुणांची लाखोंची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील कामाची टेंडर घेणाऱ्या दोन ठेकेदारांनी अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्रे देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत आळंदी देवाची येथील २१ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी उदय शिंदे (वय ५०, रा. कोल्हापूर) आणि अरुण देशमुख (वय ४०, रा. सांगली) या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेंट्रल बिल्डिंग येथील सार्वजनिक बांधकाम विभागात १ फेब्रुवारी २०२४ ते ३० मे २०२५ दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय शिंदे आणि अरुण देशमुख हे सार्वजनिक बांधकाम विभागाची टेंडर घेतात. त्यांची एका महिलेच्या माध्यमातून तरुणांशी ओळख झाली. त्यांनी या तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात गट-क पदावर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
ठेकेदार असल्यामुळे सेंट्रल बिल्डिंगमधील सार्वजनिक बांधकाम विभागात आपली ओळख असल्याचे त्यांनी दाखवून तरुणांचा विश्वास संपादन केला. प्रत्येकाकडून तीन लाख रुपये घेतले. नोकरीसाठी तरुणांनी वारंवार पाठपुरावा केल्यावर त्यांना गट-क पदावर नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले.
हे पत्र घेऊन जेव्हा ते सार्वजनिक बांधकाम विभागात गेले, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे नाकारले. त्यामुळे अखेर या तरुणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अशा प्रकारे या दोघांनी अनेक तरुणांची फसवणूक केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात आतापर्यंत ८ जणांनी तक्रार अर्ज दिले असून, या दोघांनी ४० ते ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.
