मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया समूहाच्या महाविद्यालयांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, नेव्हिल वाडिया महाविद्यालय आणि कुसरो वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
महात्मा फुले जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२५ रोजी प्रख्यात लेखक, वक्ते व दैनिक लोकमत – पुणेचे संपादक संजय आवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात त्यांनी आजच्या तरुणांनी सजग राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“तरुणांपर्यंत आजचे राजकारण पोहोचले पाहिजे. त्यांना जागरूक करण्यासाठी छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचा खरा इतिहास महाविद्यालयीन स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “भारतीय संविधान हे कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर ‘We the People of India’ म्हणजेच ‘आम्ही भारतीय लोक’ यांना अर्पण केले आहे. आजचा काळ महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे. एकवेळ मला लष्कर-ए-तोयबाची भीती वाटत नाही, पण ‘होयबा’ करणाऱ्यांची भीती वाटते.”
“आपल्या मुलांनी किती गुण मिळवले यापेक्षा, तो चांगला माणूस कसा होईल याकडे समाजाने लक्ष द्यावे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अशोक चांडक होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्यांची जपणूक करण्याचे संस्थेचे कार्य अधोरेखित करताना सर्व प्राध्यापकांनी ‘मी काय करतो’ याचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन केले.
मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंत बोरकर यांच्या पुढाकाराने तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या संयुक्त महोत्सवाच्या परंपरेचा उल्लेख करत, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बोरकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष अहिरे यांनी केले. त्यांनी सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. प्रा. तन्वी झुरुंगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. ज्योती अनिरुद्ध, प्रा. जयंत साळवे, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. विकास जाधव, प्रा. सोनाली मोरे-मधाळे, प्रा. करूणा जाधव, प्रा. सुहास जाधव व प्रा. सचिन कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. डॉ. अशोक चांडक, विश्वस्त प्रा. सचिन सानप, नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, नेव्हिल वाडिया कॉलेजच्या इनचार्ज डायरेक्टर डॉ. अनुराधा डी., डॉ. मनीषा डाले, उपप्राचार्य डॉ. समीना बॉक्सवाला–काळे, डॉ. बी. बी. बहुले, डॉ. प्रकाश चौधरी, प्रबंधक राजेंद्र तागडे, विविध शाखांचे डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नम्रता जहागीरदार यांनी केले.
