महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : श्री ऐनापूर मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. P.K. ग्रुप, बाजारपेठेतील व्यापारी, मित्रपरिवार आणि ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.
या निमित्ताने तब्बल २,५०० भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला. संध्याकाळी पार पडलेल्या दीपोत्सवामुळे मंदिर परिसर प्रसन्न व चैतन्यमय झाला होता. मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या वर्षी प्रथमच मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तसंकलनाचे कार्य श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडले. हा उपक्रम भाविकांच्या सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरला.
पहाटे मंदिराचे पुजारी श्री. सतीश गुरुलिंग स्वामी आणि श्री. सागर स्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली. अभिषेक व आरती मंदिर ट्रस्टी श्री. अशोक वाळके यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीनंतर P.K. ग्रुपच्या युवकांनी सामूहिकरीत्या हनुमान चालीसा पठण केले आणि “जय श्रीराम – बजरंग बली की जय” च्या घोषणांनी परिसर भक्तिमय केला.
दुपारी श्रींची भव्य आरती बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या वतीने पार पडली. आरतीपूर्वी श्रींना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आरतीदरम्यान संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरून गेले.
या आरतीसाठी बाळासाहेब तातेड, प्रशांत कथले, संजय श्रीश्रीमाळ, अविनाश तोष्णीवाल, राम डोंबे, श्रीकांत करवा, आनंद सुराणा यांच्यासह इतर मान्यवर व्यापारी मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. ही सजावट राम डोंबे आणि दादा कोरे यांच्या पुढाकाराने साकारण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभम बाळवणे, मधुर कथले, पवन श्रीश्रीमाळ, प्रसाद गंधे, आप्पा घबाडे, प्रतीक कथले, शिवम महाजन, संकेत लाड, किरण श्रीश्रीमाळ, राजाभाऊ गोसावी, सचिन होनराव, प्रथमेश बेळे, प्रतीक जोशी, आकाश देवकर, आकाश पाटील, आमय होनराव, रोहित गुडे आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रद्धा, सेवा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
