चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी, मोक्कातून सुटल्यानंतर केले होते २ वर्षे तडीपार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुनी वडारवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, असे गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तडीपार केले होते. असे असतानाही पुणे शहरात प्रवेश केलेल्या तडीपार गुंडाला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे आढळून आली.
अजय चंद्रकांत विटकर (वय २३, रा. हरिहरेश्वर सोसायटीसमोर, जुनी वडारवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार बाबासाहेब पांडुरंग दांगडे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय विटकर याची टोळी असून तो टोळीप्रमुख आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आपल्या टोळीचे वर्चस्व टिकवण्यासाठी तो परिसरात दहशत माजवत होता. त्यामुळे २०२२ मध्ये त्याच्यासह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्कामधून त्याची गेल्या वर्षी सुटका झाली. त्यानंतरही त्याने आपली गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली, त्यामुळे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.
हनुमान जयंतीनिमित्त चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तपास पथकाला बातमी मिळाली की, तडीपार गुंड अजय विटकर पुन्हा वडारवाडीमध्ये आला आहे. त्यानुसार पोलिसांनी वडारवाडीतील पठाण गल्ली येथे सापळा रचून अजय विटकरला पकडले.
त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २१ हजार रुपयांचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आश्विनी ननवरे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, संदीप दुर्गे, श्रीधर शिर्के, पोलीस अंमलदार गणेश तरंगे यांनी केली आहे.
