१११११ किलो धान्याचे मोफत वितरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माणुसकीला धर्म मानणाऱ्या महावीर फूड बँक, पुणे शाखेच्या सेवाभावी कार्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला. विविध समाजसेवक, दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने एकूण १११११ किलो (अकरा हजार एकशे अकरा किलो) धान्याचे विक्रमी अन्नदान करण्यात आले. पुणे शहर व परिसरातील अनेक अनाथ, अपंग, महिला व वृद्धाश्रमांमध्ये या धान्याचे मोफत वितरण झाले.
“दिया उसका भला, नहीं दिया उसका भी भला” अशा भावनेने एकत्र आलेल्या समाजभूषण, दानशूर, सेवाभावी मान्यवरांनी या उपक्रमात आपली निस्वार्थ भूमिका बजावली. समाजभूषण प्रमिला सांकला, समाजमाता विमलबाई भंडारी, जाणता राजा विजयकांत कोठारी, राजश्री पारख, डॉ. अशोककुमार पगारिया, लता पगारिया, अशोक कुंकुलोळ, शांतीलाल नवलखा, प्रवीण तालेडा, रूपल चोरडिया, अनिता खाबिया, अलका यादव आणि इतर अनेक मान्यवर या सेवाकार्यात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड, उपाध्यक्ष किशोर छाजेड, मार्गदर्शक शांतीलाल नवलखा, सहसचिव संतोष कर्नावट, सूत्रसंचालक सेजल कटारिया आणि सहकार्य करणारे गुलाबजी कवाड (बासा), भरत कवाड, प्रवीण तालेडा, प्रवीण चोराबोले सुनील मुथ्था यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
“कर भला, होगा भला”, “जय गुरु आनंद, जय ऋषी कुंदन, जय ऋषी प्रवीण” या घोषवाक्यांनी कार्यक्रमाचे वातावरण भक्तिभावाने भरलेले होते. प्रत्येक पिशवीत केवळ धान्यच नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा गंध भरलेला होता.
या अन्नदानातून केवळ पोट भरले नाही, तर अनेकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले. एक वृद्ध महिला म्हणाली, “हे अन्न नव्हे, हे देवाचं वरदान आहे.” अशा प्रतिक्रिया आयोजकांना पुढील सेवा कार्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ठरल्या.
महावीर फूड बँकचा हा सामाजिक उपक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर माणुसकीचा महोत्सव होता. गरजूंना दिलासा देणाऱ्या या सेवेसाठी आयोजकांनी भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक आणि योजनाबद्ध पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
