वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकासमोरील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अहिल्यानगरला जाण्यासाठी आलेल्या तरुणाला वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकाबाहेर सायंकाळी गर्दीच्या वेळी चाकू दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघा चोरट्यांनी त्याच्याकडील दीड लाख रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला.
याबाबत राहुल जालिंदर कासार (वय २५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकासमोर १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता, गर्दीच्या वेळी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कासार हे स्विगी कंपनीत काम करतात. ते अहिल्यानगरला मावशीच्या घरी जाण्यासाठी १२ एप्रिल रोजी सायंकाळी वाकडेवाडी एस. टी. बसस्थानकावर आले होते. बसला थोडा वेळ असल्याने खाण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी बाहेर आले.
घरी कॉल करण्यासाठी त्यांनी मोबाईल बाहेर काढल्यावर एकाने अचानक त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, तर दुसऱ्याने त्यांच्या पोटाला धारदार चाकू लावला. “आवाज किया तो इधरच मार दुंगा” असे म्हणत दुसऱ्याने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि धमकी दिली, “इसके बारे में पोलीस में गया तो तुझे जिंदा नहीं छोडेंगे,” असे म्हणत ते वाकडेवाडीकडून अंडी उबवणी चौकाच्या दिशेने निघून गेले.
या प्रकारामुळे घाबरून त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. ते थेट अहिल्यानगरला गेले. तिथे मावशीला हा प्रकार सांगितला. तिच्या धीर दिल्यानंतर ते तोफखाना पोलीस ठाण्यात गेले. मात्र, हा प्रकार खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिथे जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संशयितांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
