धायरीतील घटना : सिंहगड रोड पोलिसांनी गुंडाला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ कारणावरून धायरीतील गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानात एका गुंडाने दोघा तरुणांवर ‘‘तू लय माजला आहेस का?’’ असे म्हणत धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
याबाबत मनोज माहेन वानखेडे (वय २०, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण गेजगे याला अटक केली आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास धायरीतील गोकुळनगर पार्किंगच्या मोकळ्या मैदानात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज वानखेडे यांच्यावर सध्या नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा जबाब घेतला. सायंकाळी किरकोळ कारणावरून मनोज वानखेडे आणि करण गेजगे यांच्यात वाद झाला होता.
करण गेजगे याच्यावर यापूर्वी वाहन जाळल्याचा गुन्हा दाखल आहे. १३ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास मनोज वानखेडे आणि त्यांचा मित्र यश पंकज देसाई हे सिगारेट घेण्यासाठी बाबा पान शॉपजवळ गेले होते.
सिगारेट घेऊन परत गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानाकडे जात असताना करण गेजगे त्यांच्या पाठीमागून आला. त्याने ‘‘तू लय माजला आहेस का?’’ असे म्हणत हातातील लोखंडी धारदार हत्याराने मनोज यांच्या कानावर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर वार केला.
यश देसाईच्या उजव्या हाताच्या पंजावरदेखील वार करून त्याला गंभीर जखमी केले. दोघांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. हे पाहून करण गेजगे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. नागरिकांनी दोघांना तातडीने नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करत आहेत.
