शेतकऱ्याच्या मुलाचा साहित्य क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास : २१हून अधिक पुस्तकांचे लेखक, उत्कृष्ट वक्ते व संघटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील माणकेश्वर गावच्या सुपुत्र प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील प्रा. जोशी यांची ही निवड साहित्य क्षेत्रात मोठ्या कौतुकाचा आणि आनंदाचा विषय ठरली आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांचे बालपण व शिक्षण बार्शी येथील सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांचे साहित्यावर प्रेम आणि आईचे भारूड गायन यामुळे लहान वयातच त्यांच्या साहित्यप्रेमाची पाळेमुळे रुजली. या सुसंस्कारांमुळे लेखन व वक्तृत्व या क्षेत्रात त्यांची सुरुवात झाली.
वयाच्या ४३व्या वर्षी प्रा. जोशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वांत तरुण कार्याध्यक्ष झाले. २०१६ पासून ते कार्यरत असून, अनेक विधायक बदल व उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले. त्यांच्या कार्यकाळात परिषदेने नव्या उंची गाठल्या.
प्रा. जोशी यांनी आतापर्यंत ललित, विनोदी, चरित्र, आत्मपर, तत्त्वचिंतनपर अशा विविध वाङ्मय प्रकारांत २१हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. गदिमा चैत्रबन, अनंत काणेकर, साधना पुरस्कार यांसह सुमारे दोन डझन साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
सिव्हिल इंजिनीअर असलेले प्रा. जोशी हे पुण्यातील भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी अध्यापन आणि साहित्यसेवा यांची सांगड घालणारे आयुष्य निवडले.
त्यांचे व्याख्यान महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख व्याख्यानमालेत झाले असून अमेरिका, दुबई, मलेशिया, सिंगापूरसारख्या देशांतही त्यांनी साहित्य व तत्वज्ञानावर प्रभावी भाषणे दिली आहेत. संत साहित्य, विवेकानंद, योगी अरविंद, विनोदी लेखन, तत्त्वज्ञान अशा विषयांवर त्यांचे व्याख्यान ग्रामीण श्रोत्यांपासून ते शहरी विद्वानांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
प्रा. जोशी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू देखील नवीन रूपात अवतरली. दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमांनी पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात परिषदेचा ठसा अधोरेखित झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली येणारी ९९वी, १००वी आणि १०१वी अखिल भारतीय साहित्य संमेलनेही ऐतिहासिक ठरणार आहेत.
ग्रामीण भागातून आलेल्या, कोणत्याही गॉडफादरशिवाय, केवळ गुणवत्तेच्या बळावर पुण्यात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या प्रा. मिलिंद जोशी यांची ही साहित्यिक घोडदौड महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून आता त्यांची जबाबदारी अधिक वाढणार असून, ती ते समर्थपणे पार पाडतील, यात शंका नाही.
