सुरक्षा साधने न पुरविल्यामुळे डेव्हलपर व ठेकेदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथील काळेपडळ येथे घडली.
मृत मजुराचे नाव राजू सोपान अवचर (वय ४३, रा. आर्दशनगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रोड) असे आहे. या प्रकरणी अवचर यांचे चिरंजीव कृष्णा अवचर (वय २८) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी श्री हरी डेव्हलपरचे स्वप्नील विकास बनकर (वय ३०, रा. भोसलेनगर, हडपसर), रघुनाथ बबन खोपकर (रा. फातिमानगर, वानवडी) आणि ठेकेदार संतोष बाबुराव राठोड (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता काळेपडळ येथील जे. एस. पी. एम. कॉलेजच्या मागे, अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ सुरू असलेल्या बांधकामस्थळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील बनकर आणि रघुनाथ खोपकर यांच्या श्री हरी डेव्हलपर या कंपनीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते.
रविवारी, राजू अवचर हे काही अन्य कामगारांसोबत चौथ्या मजल्यावर सेंटिंगचे काम करत होते. दुपारी जेवणानंतर जिन्याकडे जात असताना ते वरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उचांवर काम सुरू असताना, बांधकाम मजुराला हेल्मेट, सुरक्षापट्टा यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, तसेच पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहेत.
