धायरीतील श्री ज्वेलर्समधील भरदुपारीची घटना : वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वेळी केले कृत्य
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी २५ ते ३० तोळे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी भर दुपारी धायरीत घडली.
धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकात असलेल्या श्री ज्वेलर्स या सराफ दुकानात मंगळवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री ज्वेलर्सचे मालक विष्णु सखाराम दहिवाल आणि त्यांचा एक कामगार दुपारी दुकानात उपस्थित होते. त्यावेळी एकजण दुकानात आला. त्याने “सोन्याची चैन दाखवा,” असे सांगितले. त्यानुसार मालक विष्णु दहिवाल सोन्याची चैन दाखवत असताना आणखी दोघे दुकानात आले.
तिघांनी मिळून दहिवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यांनी दुकानातील २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने गोळा केले. दहिवाल यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिघांनी त्यांना हाताने व पिस्तुलाच्या बटने मारहाण केली आणि दुचाकीवरून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचे वर्णन विष्णु दहिवाल यांनी पोलिसांना दिले आहे. पहिला चोरटा अंदाजे ३५ वर्षांचा असून त्याने लाल रंगाचा अर्धबाही टी-शर्ट आणि निळी जीन्स पँट घातली होती.
दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षांचा असून त्याने काळ्या रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, काळी पँट घातली होती आणि तोंडावर मास्क होता. तिसरा चोरटा अंदाजे २५ वर्षांचा असून त्याने क्रीम रंगाचा फुल बाह्यांचा गोल गळ्याचा टी-शर्ट, पांढरी जीन्स पँट, पांढरे शूज, डोक्यावर खाकी रंगाची कॅप आणि पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेतली होती.
त्यांच्याकडील पिस्तुल हे नकली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या दरोड्याच्या वेळी नेमका वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही तपासला जात आहे. या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करून पोलिसांनी परिसरात वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
