पाटणा पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, १५ जण पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पाटणा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते पुण्यातील कोथरूडमधील डी. पी. रोडवरील इंद्रायणी सोसायटीत राहत होते. खेड शिवापूर येथे त्यांची ‘सेंट्रीफ्यूगल कास्टिंग बेअरिंग’ नावाची कंपनी होती.
शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवराज सागी यांच्याशी व्यावसायिक चर्चेसाठी संपर्क साधला होता. सेंट्रीफ्यूगल कास्टिंगबाबत फोन व ई-मेलच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर सागीने त्यांना पाटण्यास आमंत्रित केले होते. त्यानुसार शिंदे ११ एप्रिल रोजी पुण्याहून पाटण्याला गेले.
पाटणा विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी पत्नीशी संपर्क साधून आपण सुरक्षित पोहोचलो असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी झारखंडला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कोथरूड पोलिसांनी पाटणा पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, १२ एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यातील घोसी गावात एका अनोळखी मृतदेहाचा सापडला. त्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा होत्या. पुढील तपासात त्या मृतदेहाची ओळख लक्ष्मण शिंदे यांच्याप्रमाणे पटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा विमानतळावरून अपहरण केल्यानंतर शिंदे यांना पाटणा, नालंदा आणि जहानाबाद या विविध ठिकाणी नेण्यात आले. त्यांच्या बँक खात्यांमध्ये काही संशयास्पद व्यवहारही झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिस तपासात हेही उघड झाले आहे की, सायबर गुन्हेगारांनी झारखंडमधील कोल इंडिया कंपनीच्या भंगार व्यवहाराचे आमिष दाखवून शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. मोठ्या नफ्याच्या आमिषामुळे ते पाटण्यास गेले होते. मात्र, ही एक सायबर फसवणुकीची योजना होती.
पाटणा पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण १५ जण पोलिसांच्या ताब्यात असून, चौकशी सुरू आहे.
लक्ष्मण शिंदे हे पुणे आभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) माजी विद्यार्थी होते. ते ‘रत्नदीप कास्टिंग’चे संस्थापक असून, कास्टिंग घटकांच्या निर्मितीमध्ये त्यांना विशेष कौशल्य होते.
