आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

Spread the love

पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार यांची पानटपरी असून त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये गुटखा सापडल्याने पिंपरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी जप्त केली होती. ही दुचाकी परत मिळवण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक बोकेफोडे यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रार ११ एप्रिल रोजी प्राप्त झाल्यानंतर ११ व १२ एप्रिल रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. तपासात तडजोडीनंतर बोकेफोडे यांनी ३० हजार रुपये घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर तक्रारदाराला ३० हजार रुपये घेऊन येण्यास सांगण्यात आले.

१५ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोहननगर पोलीस चौकीत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना बोकेफोडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.