महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
टोळीप्रमुख सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण (वय १९, रा. पवळे चौक, कसबा पेठ), शक्ती गुरव (रा. लातूर) अशी ‘मोक्का’ कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
सनी जाधव याच्या टोळीवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे, लुट, दहशत माजविणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी परिसरात झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांनी तपास करून सनी जाधव, सलमान शेख, हर्षल चव्हाण या तिघांना अटक केली. शक्ती गुरव याचा शोध सुरू आहे.
टोळीप्रमुख सनी जाधव याने टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित टोळी तयार केली. लोकांमध्ये दहशत पसरवून स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना पाठविला.
मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, शशांक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार अनिल कर्चे, प्रतिक करंजे यांनी केली आहे.
