चिडलेल्या शेजाऱ्याची किराणा दुकानदाराला बेदम मारहाण : दुकानात तोडफोड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उधारीच्या रकमेची परतफेड होत नसल्यामुळे एक किराणा दुकानदाराने मोटारसायकल विक्रीच्या वेळी घेतलेला चेक वटवला. त्यामुळे संतापलेल्या शेजाऱ्याने दुकानदाराला बेदम मारहाण केली आणि दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. ही घटना हडपसर परिसरातील मोरे वस्ती येथे १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.
वैभव ज्ञानदेव चव्हाण (वय २९, रा. गुरुदत्त पार्क, मोरे वस्ती रोड, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल बाळू कुचेकर, अशोक विठ्ठल कुचेकर, प्रणव रावळ (सर्व रा. मोरे वस्ती, मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव चव्हाण यांचे ‘ओम बालाजी ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान त्यांच्या घराजवळ आहे. त्यांच्या शेजारी विठ्ठल कुचेकर हे राहतात. वैभव यांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी विठ्ठल यांना मोटारसायकल ६० हजार रुपयांना विकली होती. त्यापैकी केवळ ५४ हजार रुपये त्यांनी दिले होते.
उरलेले ६ हजार रुपये आणि दुकानातून उधारीवर घेतलेल्या ५ हजार रुपयांची रक्कम मिळून एकूण ११ हजार रुपये विठ्ठल यांच्याकडे थकीत होते. पैसे मागूनही न मिळाल्यामुळे वैभव यांनी मोटारसायकल विक्रीच्या वेळी विठ्ठल यांनी दिलेला बँकेचा चेक बँकेत टाकून ११ हजार रुपये काढून घेतले.
यामुळे विठ्ठल चिडले आणि सायंकाळी पत्नी अंजलीसोबत दुकानात येऊन वैभव यांच्याशी हुज्जत घालू लागले. “तुम्ही चेक का वटवला?” असे विचारून धमकी दिली व दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या.
त्यांच्यानंतर मुलगा अशोक कुचेकर, त्याचा मित्र प्रणव रावळ आणि इतर काही जण दुकानात आले. त्यांनी पट्ट्याने वैभव चव्हाण यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या वडिलांना काठी आणि दगडाने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार बनसुडे करत आहेत.
