दुरुस्तीस विलंब झाल्यास १ मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : तालुक्यातील आरसोली ते भूम मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले.
आरसोली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूम ते आरसोली हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आला होता.
परंतु, काहीच दिवसांत या रस्त्यावरील डांबर व खडी पावसामुळे वाहून गेली असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. हा रस्ता बार्शीला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.
मात्र, रस्त्याची खराब अवस्था पाहता दुचाकींसह अन्य वाहनेही धड चालत नाहीत. अपघातांचे प्रमाण वाढले असून, बसच्या फेऱ्या देखील या रस्त्यावरून बंद किंवा कमी करण्यात आल्या आहेत.
दैनंदिन गरजांकरिता — शाळा, महाविद्यालये, दवाखाने आणि शेतीमाल वाहतुकीसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वारंवार निवेदन देऊनही या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, संबंधित विभागाने या रस्त्याचे दर्जेदार काम किती दिवसांत पूर्ण होणार आहे, याबाबत लेखी स्वरूपात उत्तर द्यावे. अन्यथा दिनांक १ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
