प्रकाश धारीवाल यांच्या नावाचा गैरवापर : कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करून एका अज्ञात व्यक्तीने आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात धारीवाल यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या नावाचा गैरवापर करत, 9850994062 या मोबाईल क्रमांकावरून बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या अकाऊंटवरून एक अनोळखी इसम विविध लोकांशी संपर्क साधून, आपणच प्रकाश धारीवाल असल्याचे भासवत आर्थिक मदतीची मागणी करत आहे.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन, प्रकाश धारीवाल यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सायबर फसवणुकीच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने, कोणीही या क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही मागणीला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
सोशल मीडियावरून किंवा मेसेजद्वारे आलेल्या कोणत्याही आर्थिक मागणीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची योग्य पडताळणी करावी, अन्यथा फसवणुकीचा बळी पडण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
