हॉटेलऐवजी स्वत:च्या क्युआर कोडवर घेतले पैसे : पाच वर्षे करत होता फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी हॉटेलचा क्युआर कोड देण्याऐवजी स्वत:चा क्युआर कोड देऊन एका हॉटेल व्यवस्थापकाने तब्बल ३१ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अमोल अर्जुन भुसाळे (रा. हर्षवर्धन कॉम्प्लेक्स, दगडे पाटीलनगर, शिवणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत हॉटेलचे मालक विजय प्रभाकर आवटी (रा. करिश्मा सोसायटी, कोथरूड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एरंडवणे येथील काटा किर्र हॉटेलमध्ये जानेवारी २०१९ पासून १६ जून २०२४ या कालावधीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय आवटी यांचे एरंडवणे येथे काटा किर्र हे हॉटेल आहे. त्यांच्याकडील कॅश काउंटरवर अमोल भुसाळे हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने हॉटेलमध्ये आलेल्या काही ग्राहकांना टोकन न देता, तसेच काहींना टोकन देऊन, ग्राहकांचे आलेले पैसे व पार्सल ऑर्डरचे पैसे हॉटेलच्या बँकेच्या स्कॅनरवर न घेता स्वत:च्या स्कॅनरवर घेतले.
गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने भुसाळे याने स्वत:च्या खात्यात ऑनलाईनद्वारे ३१ लाख ६२ हजार १२६ रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहेत.
ग्राहकाच्या फोनमुळे उघडकीस आला प्रकार
अमोल भुसाळे आता आवटी यांच्याकडे काम करत नाही. त्याने स्वतंत्र हॉटेल सुरू केले आहे. एके दिवशी आवटी यांना मिसळ पार्सल पाठवण्याबाबत फोन आला व ग्राहकाने अमोल भुसाळे यांच्या नंबरवर पैसे ऑनलाईन पाठविल्याचे सांगितले. तेव्हा भुसाळे हा स्वत:चा क्युआर कोड देऊन त्यावर पैसे घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर आवटी यांनी चौकशी केली. तेव्हा देण्यात येणारे टोकन आणि जमा झालेले पैसे यांचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसून आले. त्यातून अमोल भुसाळे याने अपहार केल्याचे उघड झाले.
