सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी तंबाखूमुक्त शपथ आणि “वाचाल तर वाचाल” या उक्तीनुसार सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची संकल्पना कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांची होती.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात तंबाखूमुक्त कार्यालय संकल्पनेअंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तंबाखू सेवन न करण्याची शपथ घेतली. यानंतर “वाचाल तर वाचाल” या प्रेरणादायी उक्तीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक वाचनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी वाचनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “वाचन ही सवय जीवनाला योग्य दिशा देते. आजच्या मोबाईलच्या युगात प्रत्येकाने वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक आहे.” या उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दुपारी ३ वाजता डॉ. दत्ता कोहिनकर लिखित “सुखी जीवनाचा पासवर्ड” या प्रेरणादायी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले.
या कार्यक्रमावेळी उप अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक जीवन मराळे, उप अधीक्षक मोनिष बधे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
