किरकोळ वादातून भांडण : लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुढीपाडव्यानंतर गावोगावी जत्रा सुरू होत असतात. सध्या यात्रा, जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येते. हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखाड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शंकर ठोंबरे (वय ३८), सुनील ठोंबरे (वय ४०), सुनील जांभळकर (वय ४२), संतोष जांभळकर (वय ३७), सागर जांभळकर (वय २७), विशाल जांभळकर (वय २९), गणेश जांभळकर (वय ३५, सर्व रा. बुर्केगाव, नगर रोड, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष महादू पवळे (वय ४९, रा. बुर्केगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला. वादातून ठोंबरे, जांभळकर यांनी अभिजित बाजारे, संदीप थोरात, सौरभ बाजारे, अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी, तसेच काठीने मारहाण केली.
आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबराट उडाली. पोलिसांनी याप्रकरणी गर्दी, तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. हा तपास सहाय्यक निरीक्षक वंजारी करत आहेत.















