आंबेगाव पोलिसांची कामगिरी : कोयता, मिरची पूड, दोरी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, मिरची पूड, दोरी असा एकूण ४० हजार रुपयांचे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चोरट्यांपैकी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ गोरक्ष चौधरी (वय २३, रा. जय शंकर कॉलनी, अंजनी नगर, कात्रज), ओंकार महादेव देवकते (वय २२, रा. गल्ली क्रमांक ७, संतोष नगर, कात्रज), रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार हनमंत मासाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलिसांचे तपास पथक बुधवारी (२५ एप्रिल) कात्रज भागात गस्त घालत होते.
त्या वेळी गंधर्व लॉनजवळ ५ ते ६ जण जमले असून, ते पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. गंधर्व लॉनजवळील मोकळ्या जागेत सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कोयता, मिरची पूड, दोरी असे साहित्य सापडले. चौकशीत आरोपींनी पैशांची अडचण असल्याने कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करत आहेत.
