महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
धाराशिव : अनिल डुंगरवाल – खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस विविध स्तरांवरील कृषी अधिकारी, कर्मचारी, व कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी खरीप हंगाम पूर्वतयारी अनुषंगाने कृषी विभागाची आढावा बैठक जिल्हा परिषद धाराशिव येथील कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी गुडूप, मोहीम अधिकारी गरगडे, तालुका कृषी अधिकारी राम बर्वे, पंचायत समिती कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) अविनाश माळी, कृषी अधिकारी गायकवाड साहेब, कृषी अधिकारी बळीराम राठोड, विस्तार अधिकारी साळवे साहेब व तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी राम बर्वे यांनी आगामी खरीप हंगामासाठी पीक पेरणी क्षेत्र आणि लागणाऱ्या बियाण्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी बियाण्यांचा साठा, नोंदवही प्रमाणित करणे, भाव फलक अद्यावत करणे आणि परवाने नूतनीकरणाबाबत माहिती दिली.
मोहीम अधिकारी गरगडे यांनी ‘साथी’ पोर्टलवरील रजिस्ट्रेशन आयडी, शंभर टक्के बियाणे विक्रीची अंमलबजावणी आणि कृषी सेवा केंद्र तपासणीबाबत सूचना दिल्या. कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांनी खताचा साठा, बफर स्टॉक, खत लिंकिंग, बियाणे मागणी व पुरवठा, IFMS ID अद्यावत करणे, कीटकनाशक विक्री आणि लेबल क्लेमसंदर्भात मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान कृषी सेवा केंद्र चालकांकडून येणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली व त्या सोडवण्याबाबत उपाय सुचवण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप कृषी अधिकारी बळीराम राठोड यांनी आभारप्रदर्शनाने केला.
















