सुभाषनगर परिसरात रात्री छापा : 462 ग्रॅम गांजा जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा धाडसी कारवाई करत गांजाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री ताडसौंदणे रोडवरील विटभट्टी, सुभाषनगर परिसरात करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव व पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी ही कारवाई पार पाडली.
गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अचानक छापा टाकून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सचिन कुमार मिरगणे (वय 33, रा. सुभाषनगर, बार्शी) आणि पांडुरंग सोमनाथ सोनवणे (वय 40, रा. मांडेगाव) हे मजुरी करणारे असून, ते गांजा विक्रीसाठी घेऊन बसले होते.
त्यांच्याकडून एकूण 462 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत रु. 9,050/- इतकी आहे. यामध्ये सचिन मिरगणे याच्याकडून 320 ग्रॅम, तर पांडुरंग सोनवणे याच्याकडून 142 ग्रॅम गांजा पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये सापडला.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(2)(ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. उमाकांत कुंजीर हे करत आहेत.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक फौजदार अजित वरपे, पोहेकॉ बाळकृष्ण दबडे, अमोल माने, श्रीमंत खराडे, बाबासाहेब घाडगे, पोना संगप्पा मुळ, पोकॉ अंकुश जाधव, सचिन देशमुख, प्रल्हाद अक्लवार, सचिन नितनात, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, इसामिया बहीरे, रतन जाधव यांनी मोलाचे योगदान दिले.
या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, समन्वय आणि धाडस अत्यंत प्रशंसनीय आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी व अंमली पदार्थांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी बार्शी पोलिसांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. या धाडसी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
