लोणी काळभोर पोलिसांनी तिघा घरमालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना तसेच खासगी मालकांनी नोकर भरती करताना सुरक्षितेबाबत दक्षता घेण्याकरीता त्याची माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या तिघा घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप एैजिनाथ तकीक (वय ३३, रा. सुतारपट्टी, गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाक वस्ती, हवेली), सरोजा प्रताप जाधव (वय ४९, रा. गणराज पार्क, कवडीपाट, कदमवाक वस्ती, हवेली), शिवाजी सुदाम कांबळे (वय ६०, रा. स्वामी विवेकानंदनगर, कदमवाक वस्ती, हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या घरमालकांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भाडेकरु बाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस, मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी दोन पथके निर्माण करण्यात आली आहेत. भाडेकरुची माहिती घेणारे पथकास तीन घरमालकांनी भाडेकरु ठेवल्यानंतरही त्याची माहिती पोलिसांना कळविली नसल्याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी या घरमालकांकडे विचारपूस केली असता त्यांनी भाडेकरुंची माहिती कळविली नसल्याचे सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार रवी आहेर, रामदास मेमाणे, प्रदिप क्षीरसागर, केतन धेंडे, प्रशांत नरसाळे, अक्षय खटके, राणी खामकर यांनी केली आहे.
