सायबर चोरट्यांनी ५५ लाखांचा गंडा घातला : खडक व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडक व वारजे पोलिस ठाण्यांत सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरटे सोशल मीडियावर विविध फायनान्स कंपन्यांच्या नावाने गुंतवणुकीचे ग्रुप तयार करतात. त्या ग्रुपमधील काही बनावट सदस्य चांगल्या परताव्याचे संदेश पाठवून इतर सदस्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात.
सुरुवातीला थोडी रक्कम परतावा म्हणून देऊन विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतविण्यास सांगितली जाते. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात येते आणि फसवणूक झाल्याचे उघड होते. अशा स्वरूपाचे गुन्हे दररोज समोर येत आहेत.
यातील एका घटनेत भवानी पेठेतील टिंबर मर्चंट कॉलनीत राहणाऱ्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी मोबाईलवर गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवले. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतवली, त्यावर परतावा मिळाल्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून एकूण ३८ लाख २४ हजार रुपये गुंतवले.
मात्र नंतर चोरट्यांनी परतावा थांबवला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे करत आहेत.
१७ लाखांची आणखी एक फसवणूक
दुसऱ्या घटनेत कर्वेनगरमधील ५३ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी १७ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करत आहेत. या प्रकरणातही शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून वेळोवेळी रक्कम बँक खात्यात भरून घेतली गेली होती.
