अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आठ दिवसांत दोन कारवाया : तिघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ओडिशा आणि धुळे येथून आलेला १३ लाख २८ हजार रुपयांचा ६४ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या आठ दिवसांत दोन कारवायांमध्ये पकडला आहे. या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, रा. कलंड, ता. रसलपूर, जि. जसपूर) आणि चंदन सुभाष कुंवर (वय १९, रा. न्यू तरोल, सेनापती कॉलनी, जगतपूर, जि. कटक, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना, १ मे रोजी पुणे रेल्वे स्टेशनच्या आऊट गेटसमोर पोलिसांना दोघेजण संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता, त्यांच्या जवळून ६ लाख २४ हजार रुपयांचा ३० किलो गांजा आढळून आला.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर, २२ एप्रिल रोजी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे पथक वाकडेवाडी एस.टी. बसस्थानकासमोरील नॅशनल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स येथील सार्वजनिक रस्त्यावर थांबले होते.
त्यावेळी एस.टी. बसस्थानकातून बॅगा घेऊन येणारे दोघेजण पोलिसांना पाहून कावरेबावरे झाले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता, राकेश रूपसिंग पावरा (वय २५, रा. शिरपूर, दापचेपाडा, जि. धुळे) व एका अल्पवयीन मुलाकडून ७ लाख ४ हजार रुपयांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्परर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रविंद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझीम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, नीलम पाटील यांनी केली.
