स्टेमसेल संशोधनाच्या नावाखाली गुंतवणुकीचा बहाणा करून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “स्टेमसेलमध्ये संशोधन करणार आहे, स्टेमसेल विकसित करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय करणार,” अशा बहाण्याने एका संशोधन संचालकाने फसवणूक केली. वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांकडून ऑर्डर मिळाल्याचे भासवून, त्यासाठी लागणारे साहित्य व कच्चा माल खरेदी करण्याच्या नावाखाली डॉक्टरांकडून ३० लाख रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात कोणताही मोबदला दिला नाही, आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी डॉ. अमितकुमार शालीग्राम पाटील (वय ४६, रा. प्रिस्टीन ग्रँड्युअर सोसायटी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी निशांत जगदीश व्यास (वय ३७, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार धायरी येथील लॉजिकल बायोलॉजी लॅब आणि वाकड येथील आयव्हीएफ नेस्ट फर्टिलिटी क्लिनिक येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वैद्यकीय व्यवसायिक आहेत. आरोपी निशांत व्यास एका कंपनीत संशोधन संचालक आहे.
त्याने डॉक्टरांना “मी स्टेमसेल संशोधन करणार आहे आणि नंतर स्टेमसेल विकसित करून त्याची विक्री करणार आहे,” असे सांगितले. तसेच, विविध ठिकाणांहून आणि कंपन्यांकडून ऑर्डर मिळाल्याचे भासवून, त्यासाठी लागणाऱ्या साहित्य व कच्च्या मालाच्या खरेदीसाठी गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्टरांकडून वेळोवेळी रोखीने आणि बँक ट्रान्सफरद्वारे एकूण ३० लाख रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतरही कोणताही परतावा किंवा लाभ न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी व्यासकडे पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
