मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघी महिलांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या कडेवरील मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
माधुरी संतोष डुकळे (घाडगे) (वय २३) आणि काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. रेल्वे फाटकाजवळ, यवत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सोनाली सुहास बोराटे (वय २६, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरातील दर्शन रांगेत रविवारी दुपारी ३ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली बोराटे या लहान मुलाला कडेवर घेऊन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. त्यांच्या मागे दोन महिला उभ्या होत्या.
त्यांनी बोराटे यांच्या कडेवर असलेल्या मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न केला. हे बोराटे यांच्या पटकन लक्षात आले. त्यांनी तेथे असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकाला सांगितले. त्यांनी या दोघी महिलांना पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. हा तपास पोलीस हवालदार गणेश काटे करीत आहेत.
