हिरवाईचा मंत्र रुजवणाऱ्या हातांना ५१ हजारांचा गौरव आणि सन्मानपत्र
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : हिरव्यागार स्वप्नांची जपणूक करणाऱ्या, सकाळच्या शांत वेळेत दोन तास झाडांसोबत मैत्री करणाऱ्या आणि गेली सहा वर्षे न थकता २५,००० झाडे लावून जपणाऱ्या बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीला राज्यस्तरीय ‘नेचर केअर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ही संपूर्ण बार्शीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
नेचर केअर फर्टिलायझर यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार यंदा विटा (जि. सांगली) येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ₹ ५१,००० रोख आणि सन्मानपत्र असे होते.
राज्यभरातून आलेल्या ८० नामांकनांमधून बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीची निवड होणे, हे त्यांच्या कार्याच्या व्यापकतेचे जिवंत उदाहरण आहे. या गौरवसोहळ्याला सेंद्रिय शेती अभ्यासक कृषी भूषण राजेंद्र भट, प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव, नेचर फर्टिलायझरचे अध्यक्ष जयंत बर्वे, कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, संचालिका कामाक्षी बर्वे, पर्यावरण अभ्यासक आशिष वेले, तसेच पुरस्कार निवड समितीचे अरुण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी बार्शीतील कार्याला मनःपूर्वक दाद दिली. वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य गेल्या सहा वर्षांपासून दररोज सकाळी दोन तास विनामोबदला श्रमदान करत आहेत. शहरात त्यांनी सुमारे २५,००० झाडे लावून ती जिवंत ठेवण्याचे श्रेयस कार्य केले आहे.
शाळांच्या परिसरात, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक जागांवर आणि कोरड्या भूखंडांवर त्यांनी हरित पट्टा निर्माण केला आहे. ही झाडं आज मोठी झालेली असून, पक्ष्यांना घरटं, प्रवाशांना सावली आणि शहराला स्वच्छ हवा देण्याचे कार्य करत आहेत.
बार्शीमध्ये जेव्हा आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, तेव्हा तो या समितीच्या परिश्रमांची साक्ष देतो. त्यांच्या अथक कार्यामुळे बार्शी शहराची ओळख आता हरित आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून होत आहे.
या पुरस्कारामुळे समितीच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून, भविष्यातही अशीच प्रेरणादायी कामगिरी सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. “ही केवळ आमची जबाबदारी नाही, तर आमचं प्रेम आहे झाडांवर, आणि बार्शीवर,” अशा शब्दांत समितीच्या सदस्यांनी आपली भावना व्यक्त केली.
