सांगलीतील कारागृहात १५ ते २० जणांना घेऊन घेतली भेट : गजा मारणे याच्या नावाने दिल्या घोषणा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येरवडा कारागृहातून गँगस्टर गजा मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात आले. मारणे समर्थक १५ ते २० जणांना घेऊन सांगली कारागृहात गजा मारणे याची भेट घेऊन त्याच्या नावाने घोषणा देणाऱ्या राईट हँडला गुन्हे शाखेच्या पथकाने सांगलीहून जेरबंद केले आहे.
बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ४०, रा. सितारामनगर, सांगली) असे या गुंडाचे नाव आहे. पांड्या मोहिते हा गजा मारणे टोळीचे वर्चस्व सांगली जिल्ह्यात राखण्यासाठी सांगली येथील ४० ते ५० जणांना गोळा केले. तसेच त्यांना घेऊन तो सांगली कारागृहात गेला.
तेथे गजा मारणे याची भेट घेऊन तेथे गजा मारणे याच्या नावाने घोषणा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. कोथरुडमधील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर मार्च महिन्यात त्याला सांगली कारागृहात ठेवण्यात येणार होते.
त्याला सांगलीला नेताना वाटेत सातारा येथील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबविण्यात आली. या व्हॅनपाठोपाठ गजा मारणे समर्थक थार व इतर गाड्यांमधून पाठलाग करत तेथे पोहचले. सतीश सुधाकर शिळीमकर याने पोलीस व्हॅनमध्ये चढून गजा मारणे याला औषधे व गोळ्या दिल्या.
मारणे याला सांगली येथे स्वत:कडील ५० हजार रुपये दिले. विशाल शिवाजी धुमाळ याने कणसे ढाबा येथे पोलीस व्हॅनमध्ये जाऊन मारणे याला मटणाचे जेवण दिले. मारणे टोळीचे सदस्यांची आरोपी जेलमध्ये जमा होईपर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था बघितली.
सीसीटीव्ही फुटेजवरुन हे सर्व समोर आल्यावर कोथरुड मधील गुन्ह्यात या तिघांचा समावेश करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण करुन सांगली येथून १४ मे रोजी बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते याला अटक करण्यात आली.
मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने मारणे याला पैशांसह इतर प्रकारची मदत पुरवली आहे. याबाबत तपास करायचा आहे. तसेच मारणे याच्या इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे.
पोलीस व्हॅनचा पाठलाग करणारी वाहने जप्त करायची असल्याचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने मोहिते याला १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार मोकाशी, कुंभार यांच्या पथकाने केली आहे.
