पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर व ‘मिशन विकसित गाव’ यशस्वीपणे राबवले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘100 दिवसीय सुशासन मिशन’ अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक 13 मे 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
या उपक्रमासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राहुल देशपांडे यांनी कार्यक्षेत्रातील गावांतील पोलीस पाटील यांच्यामार्फत नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले होते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, तसेच रक्तदात्यांची आरोग्य तपासणी होऊन स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळावी या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यामध्ये पोलीस निरीक्षक श्री. राहुल देशपांडे यांनी स्वतः रक्तदान करून पुढाकार घेतला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कदम, पोलीस कर्मचारी व नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘मिशन विकसित गाव’ या उपक्रमाची अंमलबजावणी सोलापूर ग्रामीण विभागात प्रभावीपणे सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जलसंधारणाबाबत प्रबोधन, तलावातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे, कृषी विभागाच्या सहकार्याने शेततळ्यांची उभारणी, ग्रामपंचायत शाळांमध्ये सौर उर्जेचा वापर, मधमाशी पालन व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत.
या अभियानांतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे हिरज गावामध्ये ५ जलतारा खड्डे, तर सपोनि श्री. मनोज अभंग यांच्या पुढाकाराने मौजे कुरूल येथे १ जलतारा खड्डा तयार करण्यात आला आहे. पुढील काळात इतर गावांमध्येही ‘मिशन विकसित गाव’ प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमांद्वारे सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने समाजाभिमुख सुशासनाची ठोस पावले उचलून गावविकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
