पिंपरी महापालिकेत लाचलुचपतची कारवाई, वायू प्रदूषणाबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार आली असल्याचे सांगून कंपनीची तपासणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देऊन गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून, गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे या महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. पाटील हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत. याबाबत एका ३० वर्षीय उद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार भोसरी एमआयडीसीमधील ‘श्री ट्रेडिंग’ नावाच्या कंपनीचे मालक असून, गेली १६ वर्षे ही कंपनी कार्यरत आहे.
२५ मार्च रोजी त्यांच्या कंपनीत दोघे जण आले. स्वप्नील पाटील यांनी सांगितले की, तुमच्या कंपनीविरोधात ‘सारथी’ ॲपवर वायू प्रदूषणाबाबत ऑनलाईन तक्रार दाखल झाली आहे. आजूबाजूच्या नागरिकांना कंपनीमधून येणाऱ्या वासाचा त्रास होत असल्याचे सांगून त्यांनी मोबाईलवरील तक्रार दाखवली. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांना संपूर्ण कंपनी दाखवली आणि कुठेही वायू प्रदूषण होत नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर स्वप्नील पाटील यांनी तक्रारदारांना बोलावून घेऊन कंपनीत बसून पंचनामा तयार केला. त्यानंतर त्यांनी विचारणा केली की, “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आहे का?” यावर तक्रारदारांनी “नाही” असे उत्तर दिले.
काही दिवसांनी स्वप्नील पाटील यांनी सांगितले की, तुमच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, आणि त्यासाठी नोटीस तयार झाली आहे. यानंतर तक्रारदारांनी पिंपरी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन स्वप्नील पाटील यांना भेटले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “कारवाई टाळायची असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील.”
त्यानंतर स्वप्नील पाटील यांनी तक्रारदार, त्यांच्या वडिलांना आणि कंपनीच्या मॅनेजरला वारंवार फोन करून लाचेची मागणी केली. त्यामुळे १४ मे रोजी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, स्वप्नील पाटील यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सापळा रचला. महापालिकेच्या कार्यालयाबाहेर स्वप्नील पाटील आले. तक्रारदार यांच्या कारमध्ये येऊन त्यांनी एक लाख रुपये स्वीकारले व ती रक्कम स्वतःच्या सॅगमध्ये ठेवली. त्याच वेळी तक्रारदारांनी कारचे चारही इंडिकेटर लावून इशारा दिला. तिथेच थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने स्वप्नील पाटील यांना अटक केली.
न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाटील यांना एका दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
