हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत, मनाई असलेल्या भागात काढले होते फोटो
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पहलगामवरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या जवानाच्या गणवेशात वावरणाऱ्या, हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तोतयाला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गौरव कुमार दिनेश कुमार (वय २५, रा. वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती, खराडी, मुळ रा. अलीगड, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या घराच्या झडतीत हवाई दलाचे दोन टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, हवाई दलाचे दोन बॅजेस, एक ट्रॅक सूटवरील जर्किन असे साहित्य जप्त केले आहे.
हवाई दलाचा गणवेश एक महिन्यापूर्वी जाळून टाकल्याचे त्याने सांगितले. गौरव कुमार हा खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमध्ये कामाला आहे. त्याच्याकडे हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत काढलेले फोटो मिळून आले आहेत.
याबाबत पोलीस हवालदार रामदास भोनाजी पालवे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये काम करणारा एक जण हवाई दलाचा ड्रेस घालून वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सने कारवाई केली. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकल्यावर त्याच्या घरात हवाई दलाशी संबंधित साहित्य मिळाले.
त्याच्याकडे विविध लढाऊ विमानांसोबत फोटो, हवाई दलाच्या परमेश्वरन हॉल व इतर ठिकाणी काढलेले फोटो मिळून आले आहेत. गौरव कुमार हा गेल्या एक वर्षापासून पुण्यात एकटाच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. २०२० मधील एक ओळखपत्रही त्याच्याकडे मिळून आले आहे. त्याने हा सर्व प्रकार का केला, यामागे काय हेतू होता, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत.
