पोलीस आयुक्तांनी नागपूर, संभाजीनगर कारागृहात केले स्थानबद्ध
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पदमावती परिसरातील दोघा अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून, त्यांची छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पदमावती) आणि तुषार ऊर्फ डेब्या टायगर आरणे (वय १९, रा. तळजाई माता वसाहत, पदमावती) अशी या दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
जयेश ढावरे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात २०२३ पासून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, जबरी चोरी, दरोडा, दंगा करणे, विनयभंग करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे अशा तीन गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.
त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणुकीत फरक पडला नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून जयेश ढावरे याला नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
तसेच, तुषार ऊर्फ डेब्या टायगर आरणे याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्यारे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेचा पाठलाग करणे असे तीन गंभीर गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्धच्या प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरणे याला छत्रपती संभाजीनगर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
सहकारनगर पोलिसांनी या दोघांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन प्रथम छत्रपती संभाजीनगर गाठले. तेथे आरणे याला कारागृहाच्या ताब्यात दिले. यावेळी शासकीय ठिकाणी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर थेट नागपूर गाठले. जयेश ढावरे याला नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगली येथे नेताना वाटेत सातारा येथील कणसे ढाब्यावर पोलीस व्हॅन जेवणासाठी थांबवण्यात आली होती. त्यावेळी अनेक गुंडांनी गजा मारणे याची भेट घेतल्याने चार पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलिसांनी वाटेत कुठेही थांबायची वेळ येणार नाही, याची विशेष काळजी घेतली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार विनायक एडके, भाऊसाहेब आहेर, गोरख ढगे यांनी केली आहे.
