अन पोलिसांनी त्यावरून शोधून दिली रिक्षात विसरलेली महिलेची पर्स
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आजकाल छोट्या छोट्या पेमेंटसाठी आपण ऑनलाईनद्वारे पैसे देतो. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा त्रास होत नाही. पण याच ऑनलाईन पेमेंटमुळे एका महिलेचा मोठा फायदा झाला.
घटना अशी घडली की, बँकेच्या कामासाठी आलेल्या महिलेनं रिक्षाचं भाडं गुगल पेवरून केलं. काही वेळाने तिच्या लक्षात आलं की, एक लाखांचा ऐवज असलेली पर्स रिक्षातच राहिली आहे. तिने येरवडा पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रार करताना तिने रिक्षाचं भाडं गुगल पेवरून केल्याची माहिती दिली. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून रिक्षाचालकाचं नाव आणि नंबर मिळवला. त्याच्याशी संपर्क साधून महिलेची पर्स तासाभरात परत मिळवून दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहासिनी चंद्रकांत धोत्रे (वय ४५, रा. सुभाषनगर, येरवडा) या बँकेच्या कामासाठी सोमवारी, १९ मे रोजी दुपारी एका वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गाडीतळ येथे रिक्षाने आल्या होत्या.
रिक्षाचं भाडं त्यांनी गुगल पेवरून दिलं. बँकेतील काम झाल्यावर अर्धा तासाने त्यांच्या लक्षात आलं की, आपली सोन्याची चैन व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स रिक्षामध्येच राहिली आहे. त्यांनी तत्काळ येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना रिक्षामध्ये पर्स विसरल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी रिक्षाचं भाडं गुगल पेवरून दिल्याचं सांगितलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून रिक्षाचालकाचं नाव शोधलं आणि त्याच्याशी संपर्क साधला. रिक्षाचालकाच्या लक्षात पर्स विसरल्याचं आलं नव्हतं. पोलिसांच्या फोननंतर त्याने पर्स पोलीस ठाण्यात आणून दिली.
सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, श्रेणी उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार किरण घुटे, सागर जगदाळे, कांबळे यांनी पर्स शोधून देण्यास मदत केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितलं.
