त्याच्याकडे पाहून थुंकल्याने विचारला होता जाब, लोणी काळभोर पोलिसांनी ६ जणांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : देवाच्या पूजेवरून वाद असतानाच, फिर्यादीकडे पाहून थुंकल्याने विचारलेल्या जाबावरून सेवानिवृत्त सैनिकाला टोळक्याने डोळ्यांत मिरचीपूड टाकून बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
याबाबत सेवानिवृत्त जवान प्रदीप तुकाराम जाधव (वय ४५, रा. महात्मा फुले चौक, सावता माळी मंदिराजवळ, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिल उत्तम जाधव (वय ४०), महेश राजू जाधव (वय ३८), राजू जाधव (वय ४५), पप्पू मोरे (वय ४०), संगीता राजू जाधव (वय ४३), अरुणा मोरे (वय ४०, सर्व रा. लोणी काळभोर) यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता, फिर्यादी यांच्या घरासमोर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जाधव हे भारतीय सेनेत नोकरीला होते. २०१८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. त्यांच्यावर कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. ते शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी १९ मे रोजी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली.
लोणी काळभोर गावात त्यांच्या समाजाचे आय्याप्पा स्वामी देवाचे मंदिर आहे. या देवाच्या पूजेच्या कारणावरून २०२३ पासून त्यांचे अनिल जाधव व इतरांशी वाद सुरू असून, त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.
१७ मे रोजी घरातील फिल्टरचे पाणी संपल्याने ते पाणी आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता पाणी घेऊन ते घरासमोर आले. त्यावेळी त्यांना पाहून अनिल जाधव रस्त्यावर थुंकला. त्यांनी त्याला ‘‘तू मला पाहून का थुंकलास?’’ असा जाब विचारला. त्यावर अनिल जाधवने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली.
त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी मेघा बाहेर आली. भांडणे सोडवत असताना जाधवच्या हातातील दांडके खाली पडले. तेव्हा त्याने चेंबरवर पडलेली फरशी उचलून त्यांच्या डोक्यात मारली. ते घरात पळून गेले. काही वेळाने अनिल जाधव इतरांना घेऊन परत आला. त्यांनी शिवीगाळ करत घरात घुसून संगिता हिने मिरचीपूड त्यांच्या डोळ्यांत टाकली. डोळे चोळत असताना, राजू जाधवने चाकूसारख्या हत्याराने, पप्पू मोरेने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर, कपाळावर, दोन्ही हातांवर व पायांवर मारहाण केली.
त्यांची पत्नी मेघा व मुलगी अक्षरा यांनाही हाताने मारहाण करण्यात आली. डोक्यातून अधिक रक्तस्त्राव झाल्याने प्रदीप जाधव बेशुद्ध पडले. कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर ते शुद्धीवर आले. त्यानंतर १९ मे रोजी पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून सहा जणांना अटक केली.
