आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तळजाई टेकडीवर युवकाला लुबाडले

Spread the love

पुणे : तळजाई टेकडीवर दररोज हजारो लोक फिरायला जात असताना, तेथील जंगलातील पायवाटेवर दोन चोरट्यांनी एका युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दीड लाख रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका १७ वर्षांच्या (रा. तावरे कॉलनी) युवकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार तळजाई मंदिराच्या पाठीमागील जंगलातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक मंगळवारी सकाळी फिरायला तळजाई टेकडीवर गेला होता. मुख्य रस्त्याने न जाता तो एकटाच जंगलातील पायवाटेवर गेला असताना, दोन चोरट्यांनी त्याला अडवले. चाकूचा धाक दाखवून “तुझ्या खिशात काय आहे ते काढ” असे सांगितले. त्याने खिशात काहीही नसल्याचे सांगितल्यावर, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली.

तळजाई टेकडी परिसर खूप मोठा असून, तेथील वेगवेगळ्या भागात दररोज सकाळ-संध्याकाळ हजारो लोक फिरायला येतात. सहकारनगर व पर्वती पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालण्यासाठी पथकेही नेमली आहेत. परिसरातील मुख्य रस्त्यांवर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

हा युवक नेहमीच्या पायवाटेने न जाता तळजाई मंदिराच्या मागील बाजूच्या जंगलातील पायवाटेने २ ते ३ किलोमीटर आत गेला होता. तेथेच हा प्रकार घडला. त्यानंतर त्याने परिसरातील वनरक्षक, पोलिस किंवा स्थानिक नागरिकांना काहीही सांगितले नाही. तो तसाच घरी गेला.

साधारणतः तीन तासांनंतर त्याने पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन घटनास्थळी गेले आणि तपासणी केली. दुपारी अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनानंतर त्याने पोलिसांना तात्काळ माहिती दिली असती, तर नाकाबंदी करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करता आला असता. मात्र, ही संधी पोलिसांना मिळाली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.