महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता पाचवी 1995 बॅचमधील मुला-मुलींनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
यावेळी जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम पार पडला. स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी या माजी विद्यार्थ्यांनी गावातून चालत शाळेत प्रवेश केला. शाळेत पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत गायन करून वर्ग भरवण्यात आला.
त्यावेळचे वर्गशिक्षक तुकाराम कांबळे यांनी हजेरी घेतली आणि गणितातील बेरीज-वजाबाकी शिकवली. त्यांनी आजच्या काळात समाजात वावरताना कोणत्या गोष्टींची बेरीज आणि कोणत्या गोष्टींची वजाबाकी करावी, याविषयी मार्गदर्शन करत आयुष्य सुखकर होण्यासाठी उपयुक्त विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत आखाडे यांनी केले तर अनुमोदन राहुल डोके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बडे सर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त थोरवे मॅडम, दत्तात्रय कोठावळे, धोंडीराम बटुळे, तुकाराम कांबळे, सुभाष मोटे, मधुकर इंगोले हे उपस्थित होते. कार्यक्रमात अभिजित डुंगरवाल, सुदर्शन नारटा राहुल डोके, हनुमंत आखाडे, राजेंद्र डोके, अमोल गावडे, संतोष शेंडगे, संजीवनी हावळे, संजीवनी कोकणे, बानू गायकवाड, यांच्यासह इतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सेवानिवृत्त गुरुजनांनी या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत पुढील वर्षी पुन्हा एकदा एकत्र जमण्याचा संकल्प केला.
