शवविच्छेदनातून उघड : राजेंद्र हगवणे याला मदत करणार्या ५ जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या २४ तासांत तिच्या अंगावर १५ जखमा झाल्या होत्या. तसेच, तिला मृत्यूपूर्वी आठवडाभर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केला. दरम्यान, राजेंद्र हगवणे याला फरार असताना मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले जात असले, तरी तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचे तिचे वडील आनंद कस्पटे यांनी फिर्यादीत नमूद केले होते. वैष्णवीचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशीही हगवणे कुटुंबाने तिला मारहाण केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.
हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४) आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना अटक केली आहे. त्यानंतर राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांना २३ मे रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयात वैष्णवी हिचा शवविच्छेदन अहवाल सादर केला. त्यात तिच्या अंगावर एकूण ३० जखमा आढळून आल्या. त्यातील १५ जखमा मृत्यूच्या २४ तासांच्या आत झालेल्या आहेत. १ जखम मृत्यूच्या ४ ते ५ दिवस आधीची आहे, ११ जखमा ५ ते ६ दिवसांपूर्वीच्या आहेत, तर २ जखमा ३ ते ६ दिवसांपूर्वीच्या असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
पोलिसांनी हगवणे कुटुंबाच्या घरातून पहार, साडी, स्टूल, वैष्णवी यांचा मोबाईल, घरातील सीसीटीव्ही व्हिडिओ तसेच हुंड्यात मिळालेली दुचाकी, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि दोन पिस्तूल जप्त केली आहेत.
तसेच, पाचही आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने आरोपींनी एका बँकेत तारण ठेवले आहे.
वैष्णवी यांनी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या उपचारांचे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होते. त्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये कर्नाटकातील माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव), मोहन ऊर्फ बंडु उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडु लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कर्नाटकातील रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे याच्यासाठी प्रीतम वीरकुमार पाटील याने बुकींग केल्याचे तपासात उघड झाले होते. प्रीतम पाटील याचे वडिल वीरकुमार पाटील हे कर्नाटकात सलग २८ वर्षे आमदार होते.
राजेंद्र हगवणे व प्रीतम पाटील यांना अश्व पाळण्याचा छंद आहे. त्यातूनच त्यांची मैत्री झाली होती, या मैत्रीतूनच प्रीतम पाटील याने राजेंद्र हगवणे याला मदत केली होती.
