चौघा जणांना गंडा घालणाऱ्या सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीटर शुक्ला आणि सॅमसन शुक्ला (रा. कॅलिफोर्निया अपार्टमेंट, एनआयबीएम रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव चंद्र यांची आरोपी पीटर आणि सॅमसन यांच्याशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. आरोपींनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
चंद्र यांच्यासह त्यांच्या परिचितांनी आरोपींच्या व्यवसायात एकूण ९२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही.
परतावा न मिळाल्याने चंद्र आणि त्यांच्या परिचितांनी शुक्ला बंधूंना पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी ना परतावा दिला ना गुंतवलेली रक्कम परत केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
