अंधश्रद्धेतून विवाहितेचा केला छळ, पतीसह, सासु, मावशींवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तिच्या आईवडिलांनी तिच्या मर्जीने, तिच्या आईच्या भावाबरोबर धार्मिक पद्धतीने तिचा विवाह लावून दिला. नातेवाईकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात पाटाखाली दोन लिंबे सापडली. आणि तेथूनच घात झाला. लग्न पार पडले. ते एकमेकांचे नातेवाईक असूनही, पाटाखाली सापडलेल्या लिंबांचा मुद्दा अंधश्रद्धेमुळे त्यांच्या संसारात वादग्रस्त ठरला.
तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. पतीने हाताने मारहाण केली. शेवटी ती माहेरी निघून आली. पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा पतीसह सासू व दोन मावश्यांवर दाखल केला आहे.
पती भास्कर मडिवाल (वय ३३), सासू कमल्लम्मा मडिवाल (वय ६०, दोघे रा. बालाजीनगर, गावदेवी, अंबरनाथ), मावशी ललिता मोगरे (वय ३८, रा. कृष्णानगर, पुणे), व सुनिता मॅथरल्ली (वय ३७, रा. मुक्ताल, ता. मुक्ताल, जि. महबूबनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका २५ वर्षांच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ मे २०१९ पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उरुळी देवाची येथे राहणाऱ्या आहेत.
त्यांच्या आईच्या भावाशी तिचा विवाह २६ मे २०१९ रोजी महबूबनगर येथे तिच्या मर्जीनुसार धार्मिक पद्धतीने झाला. नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी होत असताना पाटाखाली दोन लिंबे सापडली.
हाच मुद्दा सासरच्यांनी अंधश्रद्धेच्या आधारावर उचलून धरला. या कारणावरून घरातील दोन मावश्या, सासू आणि पती यांनी तिला सतत टोचून बोलून मानसिक व शारीरिक छळ केला. तिला वारंवार त्रास दिला गेला.
पतीने तिच्यावर हात उचलला, शिवीगाळ केली. तिच्या आईवडिलांनाही शिवीगाळ केली. “तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा,” असे पतीने फोनवरून सांगितले. सध्या फिर्यादी आपल्या आईवडिलांकडे राहत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार काकडे करत आहेत.
