दहावीचा सलग 21 वा शंभर टक्के निकाल : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भवानी पेठ येथील आचार्य श्री विजय वल्लभ शाळेने यावर्षीही आपल्या दहावीच्या निकालात शंभर टक्के यशाची दैदिप्यमान परंपरा यशस्वीरित्या जपली आहे. सलग २१ व्या वर्षी हा निकाल शाळेने प्राप्त केला असून, या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील दहावीतील विद्यार्थिनी समीरा सामल हिने ९७.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिला अमित पुष्पराजजी कावेडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख पारितोषिक देण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची मानकरी पायल दधीच हिने ९७.२०% गुण मिळवले असून, तिला कसलचंदजी रामजी मुथा पुरस्काराने गौरवण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनी जिया शहा हिने ९४.६९% गुण प्राप्त केले असून, तिला संघवी लालचंदजी जेठमलजी अगरचंदजी बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख पारितोषिक देण्यात आले.
याव्यतिरिक्त, प्रत्येक विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व प्रायोजकांचे कुटुंबीय, शाळा समितीचे मान्यवर सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते. शाळा समितीचे अध्यक्ष सुभाष परमार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका विमल परदेशी यांनी हा क्षण शाळेसाठी अत्यंत अभिमानाचा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निकालाचे विश्लेषण करताना विद्यार्थ्यांचे यश हे विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे त्रिवेणी प्रयत्नाचे फलित असल्याचे नमूद केले.
गौरव समारंभात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या समीरा सामल हिने आपल्या अनुभवांची आठवण सांगताना, शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व पालकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी हा क्षण अत्यंत अविस्मरणीय ठरला.
