पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी नियुक्ती : शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी प्राचार्य भानुदास गेनभाऊ रिठे यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, कार्यक्षमता आणि अनुभव पाहता ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेच्या उन्नतीसाठी सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
भानुदास रिठे हे सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेज, कोंढवा बुद्रुक येथे गेली १६ वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि शैक्षणिक कामगिरीमुळेच त्यांची पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्यासचिवपदी निवड झाली आहे. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत पुणे जिल्ह्यातील सुमारे ७०० शाळांना विद्यासमितीमार्फत प्रश्नपत्रिका वाटपाचे कामकाज केले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन विद्यासमितीमार्फत केले जाते. यामध्ये विद्यासचिव म्हणून भानुदास रिठे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या निवडीबाबत बोलताना प्राचार्य भानुदास रिठे म्हणाले, “मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक गरजा, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर उपाययोजना करणे, तसेच शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन.
ही जबाबदारी मला संधीप्रमाणे वाटते.” त्यांच्या निवडीबद्दल विद्यालयातील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
