सुनेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला फसवले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवून, सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचे खोटे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची ६ लाख रुपयांना फसवणूक केल्यानंतर, आणखी १५ हजार रुपये घेताना लोणी काळभोर पोलिसांनी तोतया महिला वकील स्नेहल कांबळे हिला रंगेहाथ पकडले.
स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातील स्नेहल कांबळे हिच्या कार्यालयात २४ एप्रिल २०२५ ते २९ मे २०२५ दरम्यान घडला.
याबाबत अहिल्यानगर (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत स्नेहल कांबळे हिने त्यांना आपण वकील असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली.
तिने फिर्यादी यांना कोर्टातून त्यांच्या सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व बँक खात्यातून पैसे घेतले. मात्र, सोडचिठ्ठी न मिळवता त्यांची फसवणूक केली.
स्नेहल कांबळे हिने फिर्यादी यांना त्यांच्या विरोधात सुनेने बलात्कार व मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, तसेच महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे सांगून त्यातून सुटका करून देण्यासाठी पोलीस व कोर्टातील कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, अन्यथा अटक होईल, अशी भीती दाखवून आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ६० रुपयांची खंडणी घेतली.
स्नेहल कांबळे आणखी पैसे मागत असल्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली.
डॉ. शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्नेहल कांबळे हिला तिच्या कार्यालयाबाहेर १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पूजा माळी, पोलीस हवालदार ज्योती नवले, पोलीस अंमलदार मंगशे नानापुरे, धुमाळ, जोजारे, कुंभार यांनी केली.
फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन – स्नेहल कांबळे हिने ग्रामपंचायतीच्या गाळ्यात वकील नसतानाही कार्यालय थाटून आपण वकील असल्याचे भासवत अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांनी तिच्या कार्यालयाची व घराची झडती घेतली असून, त्यात जुने एफआयआर, धनादेश, तक्रारीचे अर्ज, प्रॉपर्टीचे कागदपत्रे, फोटो व कोर्टाच्या कागदपत्रांची जप्ती करण्यात आली आहे.स्नेहल कांबळे हिने अशाप्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
