बार्शी पोलीस विभागाला निरोप देत नव्या जबाबदाऱ्यांकडे वाटचाल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तप्रिय सेवाभावाने बार्शी पोलीस विभागात आपली ठसठशीत छाप सोडणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सोमनाथ बाजीराव जगताप यांची अलीकडेच प्रशासकीय बदल्यामुळे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचा सन्मान व निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
जगताप यांनी बार्शी शहर येथे दोन वर्षे कोर्ट ऑर्डरली विभागात आणि तीन वर्षे गोपनीय शाखेत कार्यरत राहून उल्लेखनीय सेवा बजावली. कोर्टाशी संबंधित प्रक्रिया काटेकोरपणे हाताळत त्यांनी कार्यक्षमतेचा आदर्श घालून दिला, तर गोपनीय शाखेत त्यांनी अत्यंत संवेदनशील प्रकरणांवर विश्वासार्हतेने व निष्कलंक निष्ठेने काम केले.
प्रशासकीय बदल्यानंतर आता जगताप यांच्याकडे बार्शी डिव्हिजन अंतर्गत चार प्रमुख पोलीस ठाण्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशन, बार्शी तालुका पोलीस स्टेशन, वैराग पोलीस स्टेशन,पांगरी पोलीस स्टेशन ही चारही पोलीस ठाणी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या थेट निरीक्षणाखाली कार्यरत असलेल्या बार्शी डिव्हिजन गोपनीय शाखेअंतर्गत येतात.
या विभागात जगताप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. निरोप समारंभाच्या प्रसंगी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, बाळासाहेब जाधव, प्रदीप झालटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उ.नि. उमाकांत कुंजीर, वाहतूक शाखेचे पो.उ.नि. महेश गळगटे, धनप्पा शेटे तसेच सपोफौ अजित वरपे आणि संपूर्ण पोलीस कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सर्वांनी जगताप यांच्या शांत, संयमी, तटस्थ आणि कार्यक्षम कार्यपद्धतीचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांच्या सेवावृत्तीमुळे अनेक सहकाऱ्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे सर्वांनी नमूद केले.
सोमनाथ बाजीराव जगताप यांचे कार्य अनेक नवोदित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहे.
त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांतही ते यशस्वी ठरावेत, त्यांना उत्तम आरोग्य, यशस्वी सेवा व दीर्घायुष्य लाभो, असे निरोप समारंभा वेळी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
