वाघोलीतील मोझे कॉलेजमधील प्राध्यापकांसह सिनिअर विद्यार्थ्यांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात अवघड पेपर गेलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना दुपारचा पेपर पहाटे पुन्हा लिहिण्यास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारप्रमाणे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
प्राध्यापक प्रतीक किसन सातव (वय ३७), आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १८) आणि अनिकेत शिवाजी रोडे (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदित्य, अमोल आणि अनिकेत हे तिघेही त्या कॉलेजचे सिनिअर विद्यार्थी आहेत.
त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स-२’ या विषयाच्या लिहिलेल्या उत्तरपत्रिकांचे ६ बंडल, २ लाख ६ हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात येणाऱ्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असे की पेपर अवघड गेला आहे, आपण नापास होऊ, अशा विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेऊन रात्री पुन्हा पेपर लिहिण्यास दिला जात असे.
गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार वाघोलीत सुरू होता.वाघोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा झाल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास प्राध्यापक मदत करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ६च्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळाली.
त्यानुसार मंगळवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर छापा टाकला. प्रतीक सातव हे प्राध्यापक, कॉलेजमधील इतर तिघा विद्यार्थ्यांच्या मदतीने हा प्रकार करत होते.
आदित्य खिलारे हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांच्याकडून आधी पैसे घेत असे. त्यानंतर कोणी नसताना पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडून पेपर लिहून घेतले जात असे.
अमोल नागरगोजे व अनिकेत रोडे हे दोघे कंट्रोल रूम बनावट चावीने उघडून, ज्यांनी पैसे दिले त्या विद्यार्थ्यांचे पेपर शोधून देत आणि पेपर लिहून झाल्यावर ते पुन्हा बंडलमध्ये ठेवत असत. आदित्यने पैसे घेतलेले असे एकूण ८ विद्यार्थी पोलिसांना मिळाले आहेत.
त्यांच्या विरोधात सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, हवालदार कानिफनाथ कारखेले, हवालदार बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, शेखर काटे, गणेश डोंगरे, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, कीर्ती मांदळे आणि प्रतिक्षा पानसरे यांनी पार पाडली.
